रविवार, ४ जानेवारी, २००९

जग एकसमान आहे - इंग्रजी पुस्तक परीक्षण

नुकतेच प्रसिद्ध पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार आणि न्यूयॅार्क टाईम्सचे स्तंभलेखक श्री. थॅामस फ्रिडमन यांनी लिहीलेले 'The World is Flat' वाचनात आले. जागतिकिकरणाचे इतके चांगले विश्लेषण पहिल्यांदाच वाचायला मिळाले.

पुस्ककाच्या पहिल्या भागात फ्रिडमननी जग कसे सपाट होत चालले आहे याचा आढावा घेतला आहे. त्यांनी आधुनिक जागतिक इतिहासातल्या दहा घटनांचा आढावा घेऊन त्या घटनांमुळे जग कसं अधिकाधिक एकसमान झालं आहे याची चर्चा केली आहे. त्यांच्या मते साम्यावादाचा अस्त, नेटस्केप ब्राउझरचा शोध, कार्यवाहक प्रणाली (workflow software) चा शोध, मुक्त स्त्रोत (open source) चळवळीचा उदय, सेवा बाहेरील देशातून आयात करणे (outsourcing), माल इतर देशातून तयार करून घेणे (off shoaring), पुरवठा साखळी (supply chain), घरी राहणाऱ्या गृहिणींकडून काम करवून घेणे (insourcing), माहितीची सहज उपलब्धता आणि वायरलेस तंत्रज्ञानावर आधारीत नवनवीन उपकरणांचा शोध ह्या त्या दहा घटना होत. या घटनांमुळे जग कसे बदलले आहे ते त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या भागात जागतिकिकरणामुळे बदललेल्या जगाचे अमेरीकेवर काय परिणाम होतील याची विस्तृत चर्चा फ्रिडमन करतात. कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या अमेरीकेतून बाहेर जातील, कुठल्या नोकऱ्या अमेरीकेतच राहतील आणि अमेरीकन माणसाने त्याला कसं तोंड दिलं पाहिजे याची चर्चा फ्रिडमननी या भागात केली आहे. माझ्या मते त्यांनी या भागात मांडलेले अनेक मुद्दे जागतिकिकरणाच्या झपाट्यात सापडलेल्या कुठल्याही देशाला लागू आहेत. अमेरीकन विद्यार्थ्यांनी आपले संशोधनातील नेतृत्व कायम राखण्यासाठी गणित व विज्ञानावर भर देण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली आहे. अमेरीकेने आतापर्यंत केलेली प्रगती अमेरीकन माणसाच्या नाविन्याची कास धरण्याच्या वृत्तीमुळे झाली आहे. नवनिर्मितीसाठी ज्याप्रमाणे देशाला संशोधकांची गरज आहे त्याचप्रमाणे नवीन कल्पना सुचण्यासाठी विविध कलांची उपासना करणेही तितकीच आवश्यक आहे. केवळ अभियंत्यांच्या आणि डॅाक्टरांच्या बळावर कोणताही समाज नवनिर्मिती करु शकत नाही असे आपले मत त्यांनी उदाहरणासहीत स्पष्ट केले आहे. भारतीयांनी ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

जागतिकिकरणाचा जगातील विविध कंपन्यांवर होणारा परिणाम फ्रिडमननी एका भागात मांडला आहे. ज्याप्रमाणे अनेक अमेरीकन कंत्राटे भारतीय कंपन्याना मिळत आहेत त्याप्रमाणेच बँक अॅाफ इंडीयाचे एक मोठे कंत्राट HP या अमेरीकन कंपनीला मिळाल्याचे उदाहरण त्यांनी नमूद केले आहे. जागतिकिकरणाच्या या नवीन युगात सर्व कंपन्यांना, मग त्या कुठल्याही देशाच्या का असोत, जागतिक बाजारपेठ खुली असून ज्यांना कमी खर्चात उत्तम प्रतीची सेवा देता येईल त्यांना जागतिक बाजारपेठ जिंकता येईल. रोल्स रॅाईस, लेनोवो, एच्. पी. अशा अनेक कंपन्यांची उदाहरणे देऊन 'अमेरीकन कंपनी', 'भारतीय कंपनी' या संकल्पना धूसर होत असून सर्व कंपन्या आता 'जागतिक कंपन्या' किंवा 'बहुराष्ट्रीय कंपन्या' बनत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुस्तकातील एका भागात फ्रिडमननी जागतिकिकरणाचा जगातील लहान संस्कृतीवर काय परिणाम होईल याची चर्चा केली आहे. त्यांच्या मते माहितीच्या जाळ्याने जगातील लहान संस्कृतींना जगापुढे येण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. अमेरीकेत स्थायिक झालेल्या कित्येक भारतीयांना आज आपल्या भाषेतील कार्यक्रम टि.व्ही. वर बघता येतात, आपल्या भाषेतील वेबसाईट बघता येतात आणि आपल्या भाषेतील गाणीही ऐकता येतात. अशा अनेक उदाहरणांनी त्यांनी जगातील लहान संस्कृती नष्ट होतील व अमेरीकन संस्कृती त्यांना गिळंकृत करेल या भितीचे खंडन केले आहे. अर्थातच अमेरीकन संस्कृतीचा प्रभाव वाढेल हे ते अमान्यही करत नाहीत.

एकंदरीत या पुस्तकात भारताचा आणि भारतीय उद्योजकांचा उल्लेख बरेच वेळा आला आहे. आपल्या पुस्तकाची सुरुवातच फ्रिडमननी बँगलोरमधल्या इंफोसिसच्या मुख्यालयातील प्रसंग वर्णन सांगून केली आहे. इंफोसिसचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. नंदन नीलकेणी यांच्याशी झालेल्या चर्चेतूनच त्यांना या पुस्तकाचे नाव सापडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचा आधुनिक अर्थशास्त्रीय इतिहासही त्यांनी थोडक्यात सांगितला आहे.

पुस्तकाची भाषा सोपी व ओघवती असून अनेक तांत्रिक संकल्पना फ्रिडमननी सोप्या शब्दात मांडल्या आहेत. जागतिकीकरणामुळे जगात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे त्यांनी अचूक विश्लेषण केले आहे. हे पुस्तक ज्याप्रमाणे अमेरीकन नागरीकांची आऊटसोर्सिंग विषयीची भिती नष्ट करायचा प्रयत्न करते त्याप्रमाणेच भारतीयांना त्यांच्या कामगीरीची जाणीवही करुन देते. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर का आहे हे कोडं अमेरीकन लोकांना उलगडून सांगताना भारतापुढील आव्हानेही मांडते. ज्या जागतिक नागरीकांना या नवीन जगात यशस्वी व्हायचे आहे त्यांना हे पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक आहे.

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

अविनाश धर्माधिकारी यांचे मुंबई हल्ल्यावरील भाषण

अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.

http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc
http://www.youtube.com/watch?v=WL3kIq9nrbE
http://www.youtube.com/watch?v=WLoiYiMO3CQ
http://www.youtube.com/watch?v=i9ZjGuSn90k
http://www.youtube.com/watch?v=OrsX8v93FWY
http://www.youtube.com/watch?v=2_LfYlSM4po
http://www.youtube.com/watch?v=7EZsD9bxv4w
http://www.youtube.com/watch?v=mhDiKl5p7As
http://www.youtube.com/watch?v=_T0MSpNIAAU
http://www.youtube.com/watch?v=jXz9C70U7Qk

अविनाशजींनी सरकारसाठी मागणी पत्रक (इथे टिचकी द्या) बनवले असून त्यासाठी सह्यांची मोहीम हातात घेतली आहे. आपल्याला जमत असेल तर ह्या मोहीमेत सहभागा व्हा.

सोमवार, १ डिसेंबर, २००८

आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं...

आम्ही मुंबईकर
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं
कधी अडवाणीनी आम्हाला खेळवायचं
कधी सोनियानी चुचकारायचं
निवडणूका झाल्या की पुन्हा फेकून द्यायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी आपआपसातच लढायचं
जात-पात, धर्म आणि काहीच नाही तर भाषेवरनं भांडायचं
चाळी जाळायच्या, नाहीतर लोकांनाच जाळायचं
कसोटीच्या क्षणीही एकमेकांना लाथाडायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी बाँबस्फोट तर कधी अंडरवल्‍ड
कधी लोकल नाहीतर बस
कधी रेल्वे स्टेशन तर कधी हॉटेल
नाहीतर भररस्त्यावर कुणाच्या तरी गोळ्यांना बळी पडायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

चला उठा, जागे व्हा, झोपलेल्यांनाही जागं करा
निर्लज्ज राजकारण्यांना फेकून द्या सत्ता सिंहासनावरनं
पत्रे लिहा, फोन करा, माहीतीचा हक्क बजावा
द्या दाखवून नपुसंक राजकारण्यांना
आम्ही नवभारताचे युवक आहो
आम्हा कुत्र्याच्या मौतीने मरणार नाही!

बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

सरकार कधी जागे होणार?

कालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय? किती दिवस हे सहन करायचं? भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय? आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये? अजून किती बळी जाण्याची वाट बघणार आहोत आपण? ११ सप्टेंबर २००१ नंतर अमेरीकेत एकही दहशतवादी कारवाई झालेली नाही. परंतु या सात वर्षत भारतात किती दहशतवादी कारवाया झाल्या आहेत? भारतीयांच्या जीवाला काही मोल आहे कि नाही?

आता लोकांना स्वस्थ बसून चालणार नाही. सरकार जागं होत नसेल तर त्यांना खडबडून जागं करावं लागेल. निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. दहशतवादावर काय उपाययोजना करणार हे आपण राजकीय पक्षांना विचारलं पाहिजे. ज्या पक्षांची सरकारे (केंद्रात आणि महाराष्ट्रात) ती उलथवून टाकली पाहीजेत. गेल्या काही वर्षतील घटना पाहता माझ्या सरकारकडे पुढील मागण्या आहेत:
१) राष्ट्रीय पातळीवर दहशतवादविरोधी खास सरकारी विभाग उभारणे.
२) गुप्तहेर खाते (जे भारतात अस्तित्वात नाही असे मी मानतो) अस्तित्वात आणणे.
३) पोलिसांना अद्ययावयत शस्त्रास्त्रे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षण देणे.
४) महत्वाच्या सार्वजानिक ठिकाणी कॅमेरे लावणे.
५) संशयास्पद हालचालीची माहीती देण्याकरता २४ तास चालू असलेली राष्ट्रीय हॅाटलाईन चालू करणे.
अजूनही वेळ गेलेली नाही. भारत आर्थिक महासत्ता होण्याला दहशतवाद हा मोठा धोका आहे तो आपण वेळीच अोळखला पाहीजे. भारत सरकारने पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये दहशतवादविरोधी यंत्रणेसाठी मोठा हिस्सा राखून ठेवणे आवश्यक आहे.

मुंबईकरांची जिगर पुन्हा एकदा जगाला दिसेल. माझ्या आयुष्याची पहिली २२ वर्ष या नगरीतच गेली. ९३ च्या वेळची परीस्थिती मला आठवते आहे. पुन्हा एका दिवसात हे शहर आपल्या पायावर उभे राहील. रक्तपेढ्या पुन्हा एकदा भरतील. पण केवळ रग आहे म्हणून मुंबईकरांनी किती सहन करायचं? जिथे नुसतं जगणं हाच एक मोठा संघर्ष आहे त्या दुष्काळात हा दहशतवादाचा तेरावा महिना. मुंबईकरांना माझा पुन्हा एकदा सलाम!

ज्या लोकांनी काल प्राण गमावले - विशेषत: श्री. हेमंत करकरे (प्रमुख, दहशतवाद विरोधी पथक) - त्यांना माझी श्रद्धांजली.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २००८

धर्म हवा की नको?

लहानपणी आमच्या घरी दरवर्षी आजोबांचं श्राद्ध व पक्ष होत असे. आई एक लहानसं केळीचं पान वाढत असे. ते पान आम्ही बाहेर कावळ्यासाठी ठेवत असू. आजोबा कावळ्याच्या रुपाने येऊन ते पान खातात अशी आमची ठाम समजूत होती. थोडंसं मोठं झाल्यावर माझ्या मनात एक विचार यायचा - मुस्लिम व ख्रिश्चन लोकांत श्राद्ध वगैरे पद्धती नसतात, मग त्यांची पितरं काय करत असतील? हिंदूचीच पितरं श्राद्धाच्या दिवशी कावळ्याच्या रुपाने कशी येतात? म्हणजे एकंदरीत माणसे मेल्यावरही धर्म सोडत नाहीत तर! माझी ती समजूत अगदिच चुकीची नव्हती असं आजची परीस्थिती पाहिल्यावर वाटतं. आजकाल आपल्याला माणसं धर्मासाठी मरताना/मारताना दिसतात. अशी माणसे मेल्यावरही धर्म कसा सोडतील?

धर्म हवा की नको या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धर्म या संकल्पनेचा थोडा खोलात विचार करणं आवश्यक आहे. प्राचीन काळी जेव्हा आधुनिक विज्ञान जन्मालाही आलं नव्हतं, तेव्हा माणसाने आपल्या बुद्धिनुसार निसर्गातील अचाट करामतींच्या स्पष्टीकरणाचा केलेला प्रयत्न हा धर्म आणि देव या संकल्पनाच्या मुळाशी असावा. उदाहरणार्थ, पाऊस कसा पडतो हे आपल्याला आज शास्त्रीय दृष्ट्या माहित आहे. पण प्राचीन काळी जेव्हा पाऊस प्रथम अनुभवला असेल तेव्हा त्याला तो एखाद्या अमानवी शक्तीचा चमत्कार वाटल्यास नवल नाही. चंद्र सूर्याचे उगवणे मावळणे, समुद्राची भरती अोहोटी, अग्नी अशा अनेक गोष्टींचं आपल्याला वेगवेगळ्या धर्म व संस्कृतीमध्ये वेगवेगळं स्पष्टीकरण आढळेल. बहुतेक सर्व पुरातन संस्कृतींमध्ये या गोष्टींचं दैवीकरण झालेलं आढळेल. अर्तक्य असणाऱ्या अशा गोष्टी घडविणारा तो देव अशी संकल्पना त्यातूनच निर्मण झाली असणार.

संस्कृतीची अशी घडण होत असताना समाजातील काही हुशार मंडळींनी देव या संकल्पनेचा फायदा घेऊन आपले प्रस्थ वाढवले. हिंदुस्थानात ब्राम्हणांनी आणि मध्य पूर्वेतील व युरोपातील धर्मगुरूंनी आपले वर्चस्व राजसत्तेपेक्षाही वाढवले. असे लोक समाजाला जाचक ठरल्यावर त्यातून लोकांची सुटका करून प्रेमाचा संदेश देणाऱ्याला मग लोकांनी ठरवले. या प्रेषिताच्या अनुयायांनी एकत्र येऊन आपली अोळख वाढवली आणि त्यातूनच पुढे इस्लाम, ख्रिस्ती, बुद्ध अशा आधुनिक धर्मांचा जन्म झाला. हिंदुस्थानात असे प्रेषित जन्माला येऊनही पुरातन संस्कृतीचा पगडा मात्र कायम राहिला आणि पुढे त्या संस्कृतीलाच आजच्या युगात "हिंदुधर्म" असे नाव पडले.

धर्म या संकल्पनेचा विकास होण्याचं दुसरं कारण म्हणजे मानवाचा विकास पावलेला मेंदू आणि त्यातून उत्पन्न झालेला गर्व. माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि त्याचा जन्म आणि मृत्यू हे इतर प्राण्याच्या जन्म आणि मृत्यूपेक्षा वेगळे आहे हि त्याची गर्विष्ठ भावना. माणूस मेल्यावर स्वर्ग किंवा नरकात जातो पण हत्ती, घोडे वगैरे प्राणी मात्र नुसतेच मरतात! आपलं प्राणित्व झिडकारण्याची एवढी धडपड मानवाशिवाय इतर कुठलाही प्राणी करत नसेल!

धर्म म्हणजे नक्की काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर धर्म म्हणजे एक विचारसरणी होय. ह्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी एक वा अनेक देव असतात. ह्या देवांकडे पोचण्याचा मार्गही या विचारसरणीत आचारसंहीतेच्या रुपाने आखून दिलेला असतो. ह्या आचारसंहितेत काही बरीवाईट तत्वे असतात - उदाहरणार्थ संध्याकाळी देवापुढे दिवा लावावा यात अंधार दूर करण्याचा विचार असला पाहीजे. रात्री नखे कापू नयेत या नियमामागे वीज नसलेल्या काळात लोकांची बोटे कापली जाऊ नयेत अशी प्रेरणा असली पाहिजे. आचारसंहितेत जशा वरीलपैकी चांगल्या गोष्टी होत्या तशा वाईट किंवा आज आपल्याला अमानुष वाटतील अशाही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ सतीची प्रथा, बळीची प्रथा वगैरे. अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी मिळून प्रत्येक धर्माची एक आचारसंहिता तयार झाली व ती प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या वाटेने उत्क्रांत झाली. अशा आचारसंहितेत त्या त्या प्रदेशाचे हवामान, खाणे पिणे, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींचा प्रभाव पडला. अनेक धर्मातील लोकांनी ह्या आचारसंहिता लिहून काढल्या. काही धर्मातील काही लोक आजही ते आचार मूळ स्वरुपात अंमलात आणण्याचा अट्टाहास करताना दिसतात. एकंदरीत मानवाच्या चांगल्या वाईट्याच्या कल्पना बदलल्याने व आधुनिक विज्ञानाचा प्रसार झाल्याने बऱ्याचशा वाईट प्रथांचे उच्चाटन झाले. जस जसे विज्ञान प्रगत होत गेले, तस तसे हे नियम लोकं विज्ञानाच्या निकषावर तपासून पाहू लागले आणि त्यातूनच आजचे बुद्धिजीवी निधर्मीपण जन्माला आले.

धर्म या संकल्पनेचा समाजाशिवाय विचार करता येत नाही. वेगवेगळ्या समाजात धर्माची वेगवेगळी घडण दिसून येते. शहरी सुशिक्षित लोक धार्मिक नियमांना विज्ञान नावाच्या दगडावर घासून घेऊन जे चांगलं असेल ते उचलताना व जे वाईट असेल ते टाकताना दिसतील. अज्ञानी, खेडवळ समाज आजही जुन्या जाचक चालीरीतींचे पालन करताना दिसतील. प्रत्येक माणसाची धार्मिकता हि त्याचं शिक्षण, त्याच्या आजूबाजूचा समाज, त्याची आर्थिक परीस्थिती अशा असंख्य गोष्टींवर अवलंबून असते आणि यामुळेच धर्म हवा कि नको याचं सरळ सोपं उत्तर देता येत नाही. मी धर्म या संकल्पनेचं माझ्या कुवतीप्रमाणे विश्लेषण करुन, धर्माची मला गरज नाही या निष्कर्षाप्रत आलो आहे. परंतु अशी अनेक लोकं या जगात आहेत ज्यांच्या जगण्यासाठी धर्म हा एक महत्वाचा मानसशास्त्रीय आधार आहे. दुर्दैवाने आजकाल धर्म मानवी मनाला आधार न राहता राजकारणासाठी किंवा प्रादेशिक, आर्थिक, सामाजिक वा सांस्कृतिक वर्चस्वासाचं साधन बनला आहे. धार्मिक वादांना आलेलं आजचं हिंसक स्वरुप पाहून मात्र धर्म हवा कि नको याचं उत्तर मात्र ठामपणे नको असं वाटतं.

रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

मुंबईचा पाऊस (जुलै, १९९७)

नेहमीप्रमाणे बरोब्बर ५ वा. ७ मिनीटांनी आमची बस एल्. अँड टी. च्या ७ नंबरच्या गेट वरुन सुटली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. एव्हाना लोकल बंद झाल्या असतील की नाही यावर आमच्या बसमध्ये चर्चसत्र सुरु झालं होतं. लोकं कुठल्या स्थानकावर किती पाणी साचलं असेल याचे आडाखे बांधत होते. आमची बस दर संध्याकाळी एका वेगळ्या, आतल्या मार्गाने अंधेरी स्थानकास जात असल्याने मेन रोडवर काय परीस्थिती होती याची आम्हाला माहीती नव्हती. परंतु एकंदरीत पावसाचं स्वरुप पाहता ट्रॅफिक जाम असणार हे सांगायला 'बातम्यां' ची गरज नव्हती. एरवी मोकळा असणारा हा आतला रस्ताही आज बऱ्यापैकी वाहनांनी भरला होता. सरासरी वेगही नेहमीपेक्षा बराच कमी होता. एकंदरीत पुढे काय वाढून ठेवलाय याची हळूहळू कल्पना येत होती.

खुरडत रडत खडत बस कशी बशी अंधेरी स्थानकावर पोचली तेव्हा सात वाजून गेले होते. रस्तावर सर्वत्र पाणी साचले होते. जसजसं अंधेरी स्थानकावर जायला लागलो, तसतशी साचलेल्या पाण्याची पातळी वाढत जात होती. एकंदरीत लोकल ठप्प झाल्या असणार याचा अंदाज येऊनही प्रत्यक्ष स्थानकात जाऊन खात्री करावी म्हणून फलाटावर गेलो. फलाट माणसांनी तुडुंब भरला होता. ६ पैकी एकाही फलाटाला गाडी लागलेली नव्हती. सर्व इंडीकेटर ०:० दाखवत होते. मुंबई सेंट्रल, माटुंगा रोड अाणि सांताक्रूझ स्थानकावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाल्याच्या घोषणा होत होत्या. फलाटावर भयंकर गर्दीत थांबण्यापेक्षा काही पर्यायी व्यवस्था बघण्यासाठी म्हणून रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्थानकावर आलो. तिथेही परीस्थिती फारशी वेगळी नव्हती. आगारत एकही बस उभी नव्हती लोकाचे थवेच्या थवे बसची वाट बघत उभे होते. बऱ्याच ठिकाणी बस कर्मचाऱ्यांना लोकं घेरुन परीस्थिचा अंदाज घेत होते. शेवटी अशाच एका गर्दीत घुसून मी एका बस कर्मचाऱ्याला परीस्थिती विचारली. त्याने अंधेरी ते वांद्रे दरम्यान एस्. व्ही. रोडवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने बसेस बंद आहेत अशी उपयुक्त माहिती पुरवली. एकंदरीत दक्षिण मुंबईत जाण्याचे खुष्कीचे सर्व मार्ग बंद झाल्याचा साक्षात्कार अस्मादिकांना झाला. घड्याळ्यात ८ वाजून गेले होते आणि पोटातल्या कावळ्यांनी काव काव करायला सुरुवात केली होती. खिशात चाचपणी केल्यावर दोन रुपये हाती अाले. बाकिचे पैसे पाकिटात असतील असं समजून पाकिट उघडलं. पाकिटात एकही छदाम नव्हता. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना! पाकिट पुन्हा पुन्हा तपासूनही जेव्हा एकही पैसा हाताला लागला नाही तेव्हा परीस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं. त्या वेळी आजकालसारखी क्रेडीट कार्डे व ए. टी. एम्. तेवढी प्रचलित नव्हती. माझ्याकडे यातलं काहीही नसल्याने खिशातल्या दोन रुपयात रात्र बाहेर काढायची मी मानसिक तयारी करायला सुरवात केली. पाऊस धो धो पडतच होता. अंग संपूर्ण भिजलं होतं. समोरची चहाची टपरी मला खुणावत होती. हाती असलेल्या दोन रुपयांचा सदुपयोग करणं आवश्यक होतं. डोक्यात भरभर चक्र फिरायला लागली. अंधेरी पश्चिमेस राहणाऱ्या एका मित्राचा घरचा फोन नंबर आठवला. तो घरी पोचला असेल कि नाही याची शाश्वती नव्हती. एक रुपयाचा जुगार खेळायचं ठरवलं आणि त्याच्या घरी फोन लावला. तो घरी पोचला नव्हता आणि त्याच्या आईवडीलांशी माझी फारशी अोळख नसल्याने त्यांना परीस्थिती सांगण्यात अर्थ नव्हता. उरलेल्या एक रुपयाचा योग्य विनीयोग करणं आवश्यक होतं. टपरीवरचा चहा मला खुणवत होता. अखेर मोठ्या निश्चयाने मी तो मोह टाळून उरलेल्या १ रुपयात घरी फोन करुन आईची चिंता दूर करण्याचा निर्णय घेतला. तिला अर्थातच माझ्याकडे पैसे नाहीत हे सांगितलं नाही, नाहीतर ती उगाच काळजीत पडली असती.

काय करायचं याचा विचार करत मी बाहेर, स्वामी विवेकानंद मार्गावर आलो. रस्त्यावर अनेक लोकांचे जत्थेच्या जत्थे वांद्र्याच्या दिशेने चालत जाताना दिसत नव्हते. रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि गाड्या जवजवळ नव्हताच. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. बऱ्याच लोकांनी आपआपल्या विजारी दुमडल्या होत्या. काही लोकांनी आपले चामड्याचे बूट हातात घेतले होते. बरेचसे लोक दुकानांचा आडेसा घेऊन पादचारी पथावर उभे होते. रस्त्यावरची उपहारगृहे दुथडी भरुन वहात होती. रात्रीचे ९ वाजल्याने लोकांना भुका लागल्या होत्या. या सर्व लोकांचा मला विलक्षण हेवा वाटत होता. अर्थातच स्वत:ला दोष देऊन फारसा फरक पडणार नव्हता पण कर्तव्य म्हणून स्वत:लाच शिव्या देत होतो. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या नादात मी स्वत: वांद्र्याच्या दिशेने कधी चालायला लागलो ते माझं मलाच कळलं नाही.
बहुतेकशी लोकं गटागटाने चालत होती. एरवी एकमेकांकडे बघून चेहऱ्यावरची रेषही न हलवणारी लोकं जणूकाही वर्षांची अोळख अाहे अशा थाटात गप्पा मारत चालत होती. वांद्र्यापर्यंतचं सुमारे १५ ते १७ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी त्यांना एकमेकांच्या आधाराची - गप्पांची गरज होती. अशाच एका राजकारणावर चर्चा करणाऱ्या गटात मीही सामिल झालो. मला पोटातल्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करायचे असल्याने मला त्यांची जास्त गरज होती. बाकि राजकारण हा विषयच असा आहे की राजकारण्याबद्दल तुमचं मत काहीही असो, त्याच्यावर तहान भूक विसरुन गप्पा मारता येतात. कदाचित लोकांचा त्यांच्यावरचा प्रक्षोभच बाहेर पडत असेल. शेवटी राजकारणावर गप्पा म्हणजे राजकारण्यांना शिव्या देऊन मन थोडं मोकळं करणं होय. कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्यामुळेच मला वांद्र्यापर्यंत पोचता आलं हे संपूर्ण सत्य आहे. वांद्रे स्थानकाचं दर्श झाल्यावर चालून चालून दमलेल्या पायांमध्ये अचानक त्राण झालं. लोकं गट वगैरे विसरुन स्थानकाकडे जवळ जवळ धावत सुटले. पावसाचा जोर एव्हाना कमी झाल्याने लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. धावतच वांद्रे रेल्वे स्थानकात पोचलो. तिथलं दृश्य बघून मात्र धडकी भरली. गाड्या अजूनही सुरु झाल्या नव्हत्या आणि सर्व फलाट माणसांनी भरलेले होते. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि १७ किलोमीटरची पायपीट करुनही बूड टेकायलाही त्या फलाटावर जागा शिल्लक नव्हती.

स्थानकाबाहेर आल्यावर बऱ्याच ठिकाणी लोकं गटागटाने उभे असलेले दिसले. बहुतेक ते टॅक्सी पकडण्याकरीता तयार झालेले गट असावेत. रस्तावर गाड्यांची रहदारी जवळ जवळ नव्हतीच. बसेस पूर्णपणे बंद होत्या. एखादी टॅक्सी १५-२० मिनीटांनी येत होती आणि त्यावर अनेक लोकांच्या उड्या पडत होत्या. टॅक्सीवाले ३००/४०० असे काय अव्वाच्या सव्वा भाव लावून लोकांना घेऊन निघत होते. टॅक्सीशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याने लोकांनी टॅक्सी ड्रायव्हरचे पाय धरण्यासारशिवाय पर्यायच नव्हता. दुर्दैवाने माझ्या घराच्या बाजूने जाणारा एकही गट नसल्याने आता मला एकट्याच्या बळावर टॅक्सी पकडणे भाग होते. त्यातही टॅक्सीवाल्याला घरी गेल्यावरच पैसे देईन असे सांगणेही आवश्यक होते. न जाणे त्याने मला मध्येच सोडलं तर? अखेर बऱ्याच वेळाने बऱ्याचशा गटांशी झुंजून एका टॅक्सीवाल्याला मी २५० रुपयाच्या बोलीवर तयार केला आणि टॅक्सीत जाऊन बसलो.

आता कष्ट संपल्यागत होते. दक्षिण मुंबईकडे जाणारे रस्ते मोकळे होते. झोप अनावर होत होती. "साहब कहाँसे लेलू?" या टॅक्सीवाल्याच्या प्रश्नावर जेव्हा डोळे उघडले तेव्हा गिरगावचे दर्शन झाले. त्याला गिरगावातील आमच्या गल्लीचा रस्ता सांगितला आणि एक मोठा सुस्कारा टाकला.

बहुतेक लोकांच्या पावसाच्या आठवणी तलम, नाजूक असतात. त्यांना श्रावणमासीचा ऊन पावसाचा खेळ दिसतो. ना. धो. महानोरांच्या कविता आठवतात. पण आम्हा मुंबईकरांना मात्र आठवतं ते पावसाचं असं रौद्र रुप. हे तांडव दरवर्षी किमान एकदा अनुभवायला लागतं. आणि कधी कधी हे तांडव इतकं भयंकर रुप घेतं कि त्यात शेकडो गुरांचा/माणसांचा बळी जातो. विदर्भामध्ये दुष्काळामध्ये आत्महत्या केल्याच्या बातम्या कानावर येतात आणि सृष्टीच्या या अजब चमत्कारावर आश्चर्य व्यक्त करण्याखेरीज आपण काहीच करु शकत नाही.

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २००८

फोल 'राज' कारण

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते. देशातील परीस्थिती ज्याप्रमाणे बदलते आहे त्याप्रमाणे मतदारही झपाट्याने बदलतो आहे. दहशतीच्या मार्गाने मुंबईचे प्रश्नतर सुटणार नाहीतच परंतु हे राजकारणी सत्ता सिंहासनापासून अधिक दूर फेकले जातील.

भारताने जेव्हापासून जागतीकीकरणाचा मार्ग स्वाकारला आहे तेव्हापासून भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. जागतीकीकरणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात बेरोजगारीचं प्रमाण गेल्या १०/१२ वर्षात कमी झालं आहे. ९८ च्या सुमारास जेव्हा मी पदवीधर झालो तेव्हा वाणिज्य पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसत. आज वाणिज्य पदवीधरांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात. मग गेल्या वर्षभरात असे काय घडले कि अचानक मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वर उफाळून आला? मुंबईमध्ये किती बेरोजगार मराठी तरुण आहेत? मुंबईतील बिहारी व उत्तरप्रदेशीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात? ते ज्या प्रकारची कामे करतात ती कामे करायला मराठी तरुण पुरेश्या संख्येने उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत न पडता राजकारणी लोकं उठसुठ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात. हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! कुठल्या स्तराला गेलय आपलं राजकारण? अशा रीतीने मानवतेचा बळी देऊन मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा हे परप्रांतीय मुंबईत का येतात? याची मूळ कारणे कोणती आणि त्यावर समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तोडगे कोणते? याचा विचार झाला पाहिजे. उठसुठ लोकांना मारहाण करुन आणि स्वत:च्या लोकांच्या करातून उभारलेल्या मालमत्तेचं नुकसान करुन हा प्रश्न सुटणार नाही. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.

महाराष्ट्राला उदारमतवादी समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. गोखले, आगरकर, फुले, कर्वे पिता पुत्र, रानडे, लोकहितवादी अशी कितीतरी नावं घेता येतील. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या जोडीने समाजसुधारणेमध्ये पुढे होता. अशा या सुधारकांमुळे महाराष्ट्राला आज संपूर्ण देशामध्ये पुरोगामी म्हणून अोळखले जाते. आज आपण महाराष्ट्राची ही परंपरा विसरलो आहोत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वसा घेतलाय असे हे लोक शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत. यांच्या विरुध्द जरा कोणी काही बोललं कि त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं नाहीतर सार्वजानिक मालमत्तेची नासधूस केली जाते. ही लक्षणं एका प्रगतीशील पुरोगामी राज्याची नसून अधोगतीची आहेत. मराठी लोकांनी कुठल्या रस्त्यानी जायचं याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील परप्रांतीयाच्या प्रश्नामुळेच अमेरीकेत मेक्सिकन लोकांच्या प्रश्नावर चर्च सुरु आहे. उपविजीकेनिमित्त हजारो मेक्सिकन लोकं दरवर्षी डोंगर दऱ्या तुडवून अवैध मार्गाने अमेरीका-मेक्सिको सीमा पार करतात आणि अमेरीकेत येऊन वसतात. परंतु आपल्याप्रमाणे तिथे मेक्सिकन लोकांना पकडून मारलं जात नाही! अमेरीकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मेक्सिकन मजूरांचीही आहे याचं अमेरीकेला पक्कं भान आहे. म्हणूनच वेगवेगळे नविन कायदे करुन, जास्त काळ राहिलेल्या मेक्सिकन लोकांना नागरीकत्व देऊन आणि मेक्सिकोला आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरीकेतही अनेक विचारप्रवाह आहेत आणि त्यात मेक्सिकन लोकांना परत मायदेशी परत पाठवावे असा प्रचार करणारे लोकंही आहेत. परंतु हे लोक सर्व मर्यादा सोडून मारहाण व जाळपोळ करताना दिसत नाहीत. प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण कमी होत अाहे, त्याप्रमाणे अमेरीकेतही गोऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत अाहे. दरवर्षी जगभरातून हजारो भारतीय, चीनी, मेक्सिकन, आफ्रिकन लोकं अमेरीकेत जातात आणि कायमचं तिथले होतात. अमेरीकेतील सर्वात प्रगत अशा कॅलिफोर्निया राज्यात गोऱ्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालं अाहे. अमेरीकेत २०४२ सालापर्यंत गोऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा खाली जाईल असे अंदाज समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

भारतातील आणि जगातीतील परीस्थिती झपाट्याने बदलते आहे. ज्या समाजाची आर्थिक परीस्थिती चांगली त्याच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं प्राबल्य वाढणार आहे. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय. मराठी माणसाने इतरांची मारहाण करण्यापेक्षा मराठी बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देवताच्या उपासनेला आम्हाला परप्रांतियांच्या रक्ताची आहुती देण्याची गरज नाही. महाराष्ट्रची अस्मिता एवढी कोती नाही आणि काही लाख परप्रांतियामुळे धोक्यात येण्याएवढी लेचीपेची तर मुळीच नाही. महाराष्ट्राने बदलत्या परीस्थितीचा स्वीकार करुन संपूर्ण भारतापुढे आदर्श बनले पाहिजे. त्यातच मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीचं गुपित दडलं आहे.