मंगळवार, ११ नोव्हेंबर, २००८

फोल 'राज' कारण

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते. देशातील परीस्थिती ज्याप्रमाणे बदलते आहे त्याप्रमाणे मतदारही झपाट्याने बदलतो आहे. दहशतीच्या मार्गाने मुंबईचे प्रश्नतर सुटणार नाहीतच परंतु हे राजकारणी सत्ता सिंहासनापासून अधिक दूर फेकले जातील.

भारताने जेव्हापासून जागतीकीकरणाचा मार्ग स्वाकारला आहे तेव्हापासून भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. जागतीकीकरणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात बेरोजगारीचं प्रमाण गेल्या १०/१२ वर्षात कमी झालं आहे. ९८ च्या सुमारास जेव्हा मी पदवीधर झालो तेव्हा वाणिज्य पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसत. आज वाणिज्य पदवीधरांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात. मग गेल्या वर्षभरात असे काय घडले कि अचानक मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वर उफाळून आला? मुंबईमध्ये किती बेरोजगार मराठी तरुण आहेत? मुंबईतील बिहारी व उत्तरप्रदेशीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात? ते ज्या प्रकारची कामे करतात ती कामे करायला मराठी तरुण पुरेश्या संख्येने उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत न पडता राजकारणी लोकं उठसुठ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात. हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! कुठल्या स्तराला गेलय आपलं राजकारण? अशा रीतीने मानवतेचा बळी देऊन मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा हे परप्रांतीय मुंबईत का येतात? याची मूळ कारणे कोणती आणि त्यावर समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तोडगे कोणते? याचा विचार झाला पाहिजे. उठसुठ लोकांना मारहाण करुन आणि स्वत:च्या लोकांच्या करातून उभारलेल्या मालमत्तेचं नुकसान करुन हा प्रश्न सुटणार नाही. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.

महाराष्ट्राला उदारमतवादी समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. गोखले, आगरकर, फुले, कर्वे पिता पुत्र, रानडे, लोकहितवादी अशी कितीतरी नावं घेता येतील. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या जोडीने समाजसुधारणेमध्ये पुढे होता. अशा या सुधारकांमुळे महाराष्ट्राला आज संपूर्ण देशामध्ये पुरोगामी म्हणून अोळखले जाते. आज आपण महाराष्ट्राची ही परंपरा विसरलो आहोत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वसा घेतलाय असे हे लोक शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत. यांच्या विरुध्द जरा कोणी काही बोललं कि त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं नाहीतर सार्वजानिक मालमत्तेची नासधूस केली जाते. ही लक्षणं एका प्रगतीशील पुरोगामी राज्याची नसून अधोगतीची आहेत. मराठी लोकांनी कुठल्या रस्त्यानी जायचं याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील परप्रांतीयाच्या प्रश्नामुळेच अमेरीकेत मेक्सिकन लोकांच्या प्रश्नावर चर्च सुरु आहे. उपविजीकेनिमित्त हजारो मेक्सिकन लोकं दरवर्षी डोंगर दऱ्या तुडवून अवैध मार्गाने अमेरीका-मेक्सिको सीमा पार करतात आणि अमेरीकेत येऊन वसतात. परंतु आपल्याप्रमाणे तिथे मेक्सिकन लोकांना पकडून मारलं जात नाही! अमेरीकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मेक्सिकन मजूरांचीही आहे याचं अमेरीकेला पक्कं भान आहे. म्हणूनच वेगवेगळे नविन कायदे करुन, जास्त काळ राहिलेल्या मेक्सिकन लोकांना नागरीकत्व देऊन आणि मेक्सिकोला आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरीकेतही अनेक विचारप्रवाह आहेत आणि त्यात मेक्सिकन लोकांना परत मायदेशी परत पाठवावे असा प्रचार करणारे लोकंही आहेत. परंतु हे लोक सर्व मर्यादा सोडून मारहाण व जाळपोळ करताना दिसत नाहीत. प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण कमी होत अाहे, त्याप्रमाणे अमेरीकेतही गोऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत अाहे. दरवर्षी जगभरातून हजारो भारतीय, चीनी, मेक्सिकन, आफ्रिकन लोकं अमेरीकेत जातात आणि कायमचं तिथले होतात. अमेरीकेतील सर्वात प्रगत अशा कॅलिफोर्निया राज्यात गोऱ्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालं अाहे. अमेरीकेत २०४२ सालापर्यंत गोऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा खाली जाईल असे अंदाज समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.

भारतातील आणि जगातीतील परीस्थिती झपाट्याने बदलते आहे. ज्या समाजाची आर्थिक परीस्थिती चांगली त्याच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं प्राबल्य वाढणार आहे. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय. मराठी माणसाने इतरांची मारहाण करण्यापेक्षा मराठी बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देवताच्या उपासनेला आम्हाला परप्रांतियांच्या रक्ताची आहुती देण्याची गरज नाही. महाराष्ट्रची अस्मिता एवढी कोती नाही आणि काही लाख परप्रांतियामुळे धोक्यात येण्याएवढी लेचीपेची तर मुळीच नाही. महाराष्ट्राने बदलत्या परीस्थितीचा स्वीकार करुन संपूर्ण भारतापुढे आदर्श बनले पाहिजे. त्यातच मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीचं गुपित दडलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: