गुरुवार, २० नोव्हेंबर, २००८

धर्म हवा की नको?

लहानपणी आमच्या घरी दरवर्षी आजोबांचं श्राद्ध व पक्ष होत असे. आई एक लहानसं केळीचं पान वाढत असे. ते पान आम्ही बाहेर कावळ्यासाठी ठेवत असू. आजोबा कावळ्याच्या रुपाने येऊन ते पान खातात अशी आमची ठाम समजूत होती. थोडंसं मोठं झाल्यावर माझ्या मनात एक विचार यायचा - मुस्लिम व ख्रिश्चन लोकांत श्राद्ध वगैरे पद्धती नसतात, मग त्यांची पितरं काय करत असतील? हिंदूचीच पितरं श्राद्धाच्या दिवशी कावळ्याच्या रुपाने कशी येतात? म्हणजे एकंदरीत माणसे मेल्यावरही धर्म सोडत नाहीत तर! माझी ती समजूत अगदिच चुकीची नव्हती असं आजची परीस्थिती पाहिल्यावर वाटतं. आजकाल आपल्याला माणसं धर्मासाठी मरताना/मारताना दिसतात. अशी माणसे मेल्यावरही धर्म कसा सोडतील?

धर्म हवा की नको या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धर्म या संकल्पनेचा थोडा खोलात विचार करणं आवश्यक आहे. प्राचीन काळी जेव्हा आधुनिक विज्ञान जन्मालाही आलं नव्हतं, तेव्हा माणसाने आपल्या बुद्धिनुसार निसर्गातील अचाट करामतींच्या स्पष्टीकरणाचा केलेला प्रयत्न हा धर्म आणि देव या संकल्पनाच्या मुळाशी असावा. उदाहरणार्थ, पाऊस कसा पडतो हे आपल्याला आज शास्त्रीय दृष्ट्या माहित आहे. पण प्राचीन काळी जेव्हा पाऊस प्रथम अनुभवला असेल तेव्हा त्याला तो एखाद्या अमानवी शक्तीचा चमत्कार वाटल्यास नवल नाही. चंद्र सूर्याचे उगवणे मावळणे, समुद्राची भरती अोहोटी, अग्नी अशा अनेक गोष्टींचं आपल्याला वेगवेगळ्या धर्म व संस्कृतीमध्ये वेगवेगळं स्पष्टीकरण आढळेल. बहुतेक सर्व पुरातन संस्कृतींमध्ये या गोष्टींचं दैवीकरण झालेलं आढळेल. अर्तक्य असणाऱ्या अशा गोष्टी घडविणारा तो देव अशी संकल्पना त्यातूनच निर्मण झाली असणार.

संस्कृतीची अशी घडण होत असताना समाजातील काही हुशार मंडळींनी देव या संकल्पनेचा फायदा घेऊन आपले प्रस्थ वाढवले. हिंदुस्थानात ब्राम्हणांनी आणि मध्य पूर्वेतील व युरोपातील धर्मगुरूंनी आपले वर्चस्व राजसत्तेपेक्षाही वाढवले. असे लोक समाजाला जाचक ठरल्यावर त्यातून लोकांची सुटका करून प्रेमाचा संदेश देणाऱ्याला मग लोकांनी ठरवले. या प्रेषिताच्या अनुयायांनी एकत्र येऊन आपली अोळख वाढवली आणि त्यातूनच पुढे इस्लाम, ख्रिस्ती, बुद्ध अशा आधुनिक धर्मांचा जन्म झाला. हिंदुस्थानात असे प्रेषित जन्माला येऊनही पुरातन संस्कृतीचा पगडा मात्र कायम राहिला आणि पुढे त्या संस्कृतीलाच आजच्या युगात "हिंदुधर्म" असे नाव पडले.

धर्म या संकल्पनेचा विकास होण्याचं दुसरं कारण म्हणजे मानवाचा विकास पावलेला मेंदू आणि त्यातून उत्पन्न झालेला गर्व. माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि त्याचा जन्म आणि मृत्यू हे इतर प्राण्याच्या जन्म आणि मृत्यूपेक्षा वेगळे आहे हि त्याची गर्विष्ठ भावना. माणूस मेल्यावर स्वर्ग किंवा नरकात जातो पण हत्ती, घोडे वगैरे प्राणी मात्र नुसतेच मरतात! आपलं प्राणित्व झिडकारण्याची एवढी धडपड मानवाशिवाय इतर कुठलाही प्राणी करत नसेल!

धर्म म्हणजे नक्की काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर धर्म म्हणजे एक विचारसरणी होय. ह्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी एक वा अनेक देव असतात. ह्या देवांकडे पोचण्याचा मार्गही या विचारसरणीत आचारसंहीतेच्या रुपाने आखून दिलेला असतो. ह्या आचारसंहितेत काही बरीवाईट तत्वे असतात - उदाहरणार्थ संध्याकाळी देवापुढे दिवा लावावा यात अंधार दूर करण्याचा विचार असला पाहीजे. रात्री नखे कापू नयेत या नियमामागे वीज नसलेल्या काळात लोकांची बोटे कापली जाऊ नयेत अशी प्रेरणा असली पाहिजे. आचारसंहितेत जशा वरीलपैकी चांगल्या गोष्टी होत्या तशा वाईट किंवा आज आपल्याला अमानुष वाटतील अशाही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ सतीची प्रथा, बळीची प्रथा वगैरे. अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी मिळून प्रत्येक धर्माची एक आचारसंहिता तयार झाली व ती प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या वाटेने उत्क्रांत झाली. अशा आचारसंहितेत त्या त्या प्रदेशाचे हवामान, खाणे पिणे, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींचा प्रभाव पडला. अनेक धर्मातील लोकांनी ह्या आचारसंहिता लिहून काढल्या. काही धर्मातील काही लोक आजही ते आचार मूळ स्वरुपात अंमलात आणण्याचा अट्टाहास करताना दिसतात. एकंदरीत मानवाच्या चांगल्या वाईट्याच्या कल्पना बदलल्याने व आधुनिक विज्ञानाचा प्रसार झाल्याने बऱ्याचशा वाईट प्रथांचे उच्चाटन झाले. जस जसे विज्ञान प्रगत होत गेले, तस तसे हे नियम लोकं विज्ञानाच्या निकषावर तपासून पाहू लागले आणि त्यातूनच आजचे बुद्धिजीवी निधर्मीपण जन्माला आले.

धर्म या संकल्पनेचा समाजाशिवाय विचार करता येत नाही. वेगवेगळ्या समाजात धर्माची वेगवेगळी घडण दिसून येते. शहरी सुशिक्षित लोक धार्मिक नियमांना विज्ञान नावाच्या दगडावर घासून घेऊन जे चांगलं असेल ते उचलताना व जे वाईट असेल ते टाकताना दिसतील. अज्ञानी, खेडवळ समाज आजही जुन्या जाचक चालीरीतींचे पालन करताना दिसतील. प्रत्येक माणसाची धार्मिकता हि त्याचं शिक्षण, त्याच्या आजूबाजूचा समाज, त्याची आर्थिक परीस्थिती अशा असंख्य गोष्टींवर अवलंबून असते आणि यामुळेच धर्म हवा कि नको याचं सरळ सोपं उत्तर देता येत नाही. मी धर्म या संकल्पनेचं माझ्या कुवतीप्रमाणे विश्लेषण करुन, धर्माची मला गरज नाही या निष्कर्षाप्रत आलो आहे. परंतु अशी अनेक लोकं या जगात आहेत ज्यांच्या जगण्यासाठी धर्म हा एक महत्वाचा मानसशास्त्रीय आधार आहे. दुर्दैवाने आजकाल धर्म मानवी मनाला आधार न राहता राजकारणासाठी किंवा प्रादेशिक, आर्थिक, सामाजिक वा सांस्कृतिक वर्चस्वासाचं साधन बनला आहे. धार्मिक वादांना आलेलं आजचं हिंसक स्वरुप पाहून मात्र धर्म हवा कि नको याचं उत्तर मात्र ठामपणे नको असं वाटतं.

1 टिप्पणी:

GouriBhagwat म्हणाले...

Vaibhav ekdum zanzanit lihilas lekh. Vichar karta baryach goshti patatat ani kahi nahipatat...... Pan hich Hindu dharmachi vyakhya aahe. Pratyekala mata swatantrya aahe. Apalyala kuthalihi goshta aplya dharmane sangitlli mhanun karavich lagate ase nahi. Aplya dharmane aplyala achar vicharache swatantraya dile aahe ani te swatantrya shahanpanane wapara asa salla dila aahe. Tyamulech Hindutwa tikun aahe. Hindu ha dharma nahich muli ase mala watate. Hindutwa hi Sanskruti aahe.